२ जी घोटाळ्यात आता चिदम्बरम यांच्या वर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून ज्यांच्या कडे पहिले जाते त्यांची भूमिका आता संशयाच्या घेऱ्यात आली आहे. पंत प्रधान म्हणतात माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे... विश्वास असणे चांगले आहे पण तो कुठवर ठेवला पाहिजे याला काही सीमा असाव्यात. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्रे ज्यांच्या हातात दिली त्यांनीच जर देशाच्या तिजोरीत घट करणारी कामे केली तर कसे चालेल? अर्थमंत्रालयात असे झाले, तर रामदेवबाबा आणि अन्न हजारे यांच्या आंदोलनात आतताई निर्णय घेऊन सरकारला तोंडघशी पाडण्यात आले. गेल्या काही वर्षा पासून सरकार सतत कोर्टाचे ताशेरे स्वीकारत आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी राजकारणात घालवली त्यांना आता राजशकट हाकता येत नाही कि काय? कि पूर्वी झाकली मुठ लाखाची या उक्ती प्रमाणे घडत होते. आज माहितीच्या अधिकाराने त्याच राजकारण्याच्या वकुबा वर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
देशातील नागरिकांच्या मनात आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत .. गरीबांचे सरकार म्हणवणारे पक्ष खरोखर गरिबांसाठी सत्ता राबवीत आहेत कि भांडवलदार आणि व्यापाऱ्यांसाठी काम करते आहे? एकीकडे सामान्यांना आधार देणाऱ्या योजना राबवण्याच्या घोषणा करायच्या दुसरीकडे दारिद्र्यरेषेच्या अव्यावहारिक व्याख्या करायच्या. कोणाच्या सांगण्यावरून हे सगळे घडते आहे. देशातल्या राजकारण्यांसोबत या देशातील अधिकारी वर्गही आता या सरकारी यंत्रणेला सामन्यांपासून दूर नेत आहे.
पंतप्रधान तर प्रत्येक वेळी सत्ता कशी हातातून जाणार नाही याचाच विचार करीत असतात कि काय असे दिसते. राजा यांना पदावरून दूर करायला लागलेला उशीर, काळ्या पैसाच्या बाबतीत गुन्हे दाखल करायला केलेली चालढकल, असे अनेक प्रश्न दिवसागणिक लोकांसमोर उभे राहत आहेत. शब्दच्छल करून आपल्या पक्षाची बाजू कशी भक्कम आहे आणि बाकी सगळे फक्त चोर आणि आम्ही साव हे सिद्ध करायला वाचाळ प्रवक्त्यांची फौज निर्माण करून लोकांच्या मनात अजून गोंधळ निर्माण केला जातो आहे.
असे वाटते अराजक या पेक्षा वेगळे नसावे, कारण रोज नवीन गोंधळ आनि नवीन समस्या सरकारी धोरणातून निर्माण होताना दिसते आहे. सामन्यांना अडचणीत आणणारे निर्णय घेण्यास तत्पर असणारे सरकार भ्रष्टाचाराची अशी मोठी प्रकरणे हाताळताना दिरंगाई करते. आता सीबीआय च्या अखत्यारीत असलेल्या या सगळ्या प्रकरणांचा निकाल कधी लागेल आणि खरोखर या सगळ्या जबाबदार राजकारण धुरंदर लोकांना खरोखर शिक्षा होईल का?.. कदाचित या कोर्ट कचेरी च्या फेऱ्यात हि प्रकरणे धुळीस मिळतील.
No comments:
Post a Comment